महाराष्ट्रलोकल न्यूज़
Trending
उल्हासनगर स्टेशन परिसरात रेल्वे साहित्याची लूट ! गर्दुल्ल्यांचा झुंडीने सुरक्षा रक्षकांवर जीवघेणा हल्ला; पोलीस प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ठेकेदार हवालदिल,,,

(उल्हासनगर)दिं.१मे२०२६प्रतिनिधी-संतोष क्षेत्रे“प्रवासी संचार”ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. स्टेशन परिसरात रेल्वेच्या सुरू असलेल्या विकासकामांचे कोट्यवधी रुपयांचे लोखंडी आणि इतर महागडे मटेरियल उघड्यावर पडले असून,हे साहित्य चोरण्यासाठी गर्दुल्ल्यांनी उच्छाद मांडला आहे.धक्कादायक बाब म्हणजे,चोरीला विरोध करणाऱ्या खाजगी सुरक्षा रक्षकांवर हे गर्दुल्ले झुंडीने येऊन जीवघेणा हल्ला चढवत आहेत.वारंवार तक्रारी करूनही स्थानिक पोलीस प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने नागरिकांसह ठेकेदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काय आहे उल्हासनगर स्टेशन परिसरात सध्या रेल्वे प्रशासनाकडून विविध विकासकामे सुरू आहेत.यासाठी लागणारे लाखो रुपयांचे साहित्य स्टेशनच्या मोकळ्या आवारात साठवून ठेवण्यात आले आहे.या साहित्यावर स्टेशन परिसरातील ड्रग्ज आणि इतर अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या गर्दुल्ल्यांचा डोळा आहे.हे महागडे साहित्य चोरून ते भंगार बाजारात विकण्यासाठी गर्दुल्ल्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.या चोऱ्या रोखण्यासाठी आणि साहित्याच्या संरक्षणासाठी संबंधित ठेकेदाराने स्वखर्चाने खाजगी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.परंतु, हे गर्दुल्ले आता एकटे-दुकटे येत नसून थेट ‘झुंड’ करून येतात.सुरक्षारक्षकांनी त्यांना हटकल्यास,हे गर्दुल्ले लाठ्या-काठ्या आणि हत्यारांसह सुरक्षारक्षकांवर तुटून पडतात.त्यांना बेदम मारहाण करून उघडपणे रेल्वेचे साहित्य लुटून नेतात.
ठेकेदार आणि सुरक्षा रक्षक रामभरोसे!
या जीवघेण्या हल्ल्यांनंतर आणि साहित्याच्या उघड लुटीनंतर सुरक्षा रक्षकांनी स्थानिक पोलीस प्रशासनाकडे रीतसर तक्रारी केल्या आहेत. मात्र, पोलीस प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पोलिसांच्या या ढिम्म आणि उदासीन भूमिकेमुळे गर्दुल्ल्यांचे धाडस कमालीचे वाढले आहे. “तक्रार करूनही पोलीस येत नसतील, तर आम्ही कोणाच्या भरवशावर काम करायचे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालायचा?” असा संतप्त सवाल आता खाजगी सुरक्षा रक्षकांकडून विचारला जात आहे.
रेल्वे साहित्याची उघड लूट
सरकारी कामाचे साहित्य गर्दुल्ले टोळ्या करून चोरून नेत आहेत.सुरक्षा रक्षकांवर जीवघेणे हल्ले: झुंडीने येणारे गर्दुल्ले ड्युटीवर असलेल्या रक्षकांना बेदम मारहाण करतात.





